कपाशीवरील आकस्मिक मर रोग: करा उपाययोजना तातडीने..!

सतत सुरु असलेल्या पावसामुळे कपाशीच्या पिकात पाणी  साचल्यामुळे जमिनीतील हवा खेळण्याची क्रिया मंदावून कपाशीच्या झाडाच्या मुळावर आकस्मिक मर ( Para Wilt) या विकृतीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.

लक्षणे :   कपाशीचे झाड एका एकी मलूल होणे व पाने पिवळे पडणे , पात्या , फुले गळणे  आणि शेवटी झाड पूर्णपणे सुकून मरणे इत्यादी लक्षणे आढळतात

नुकसान : प्रादुर्भावग्रस्त झाडे उपटली असता सहज हातात येतात . पाऊस उघडल्यावर सुध्दा या रोगाची मातीत असलेली बीजे अनुकूल वातावरण म्हणजे 30 ते 35 अंश सेल्सियस तापमान मिळताच पिकाच्या मुळ्यांमध्ये प्रवेश करतात व अशी झाडे मरण्यास  सुरवात होऊन शेतातील पूर्ण पीकच नष्ट होण्याची भीती असते .

♦व्यवस्थापन ♦

(1)  प्रथम शेतातील साचलेले पाणी चर खोदून बाहेर काढावे .

(2)  मलूल झालेल्या झाडाच्या बुडाजवळ खुरपणी करून प्रति झाड 2 ते 3 ग्रॅम युरिया झाडाजवळ जमिनीत मिसळून द्यावा .

(3) झाड खोंडाच्या बुडाजवळ दोन बोटात धरून पायाने दाबावे 

(4) कॉपर ऑक्सिक्लोराइड 25 ग्रॅम  किंवा कार्बेनडेझीम 10 ग्रॅम अधिक 150 ग्रॅम युरिया अधिक 150 ग्रॅम व्हाईट पोट्याश  10 लिटर पाण्यात मिसळून तयार केलेले 150 ते 200 मिली द्रावण मलूल पडलेल्या झाडाच्या बुडाजवळ ओतावे . तसेच या द्रावणाची पिकावर फवारणी सुध्दा करावी .

(5) परत चार  दिवसांनी 200 ग्रॅम डीएपी 10 लिटर पाण्यात मिसळून 150 ते 200 मिली झाडाच्या बुडाजवळ ओतावे .

(6) ट्रायकोडरमाचा वापर उपयुक्त आढळून आला  10 लिटर पाणी अधिक 500 ग्रॅम ट्रायकोडरमा पावडर कोंब 200 मिली लिक्वीड  मिसळून त्याचे झाडाच्या बुडात  ड्रेंचिंग करावे .

वरील उपाययोजना कपाशीचे झाड मलुल दिस्ताक्षणीच  तात्काळ कराव्यात कारण याचा प्रसार खूप झपाट्याने होतो .