बांबू लागवड तंत्रज्ञान - लागवड ते काढणी संपुर्ण माहीती

  बांबूचा उपयोग –

  • वणकाम विविध हस्तकलेच्या वस्तू बनविण्यासाठी वापर करता येतो.
  • कवळ्या कोंबापासून भाजी, लोणचे असे विविध खाद्य पदार्थ बनवता येतात.
  • बांबूचा पारंपारिक उपयोग शिडी, टोपली, सुपे इत्यादी बनविण्यासाठी
  • शेतीची अवजारे, धान्य साठविण्यासाठी कणग्या इत्यादी बांबूपासून बनवतात.
  • फळपिकांना आधार देण्यासाठी बांबूचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.
  • कागद निर्मिती उद्योगातही बांबूचा उपयोग होतो. पॅकेजिंग पॉलिजिंग पॉलिहाऊस उभारणी मध्येही बांबूचा उपयोग केला जातो.
  • जमिनीची धूप थांबवणे जमिनी थांबवणे जमिनीचा कस वाढवणे अशा मृद व जलसंधारणाच्या कामातही बांबूचा उपयोग केला जातो.
  • वातरोधक पट्टे  निर्माण करण्यासाठी सुद्धा बांबूचा उपयोग होतो.
  • टेक्सटाईल इंडस्ट्रीमध्ये कपडे बनविण्यासाठी, हार्डवेअर बनविण्यासाठी बांबूचा उपयोग होतो.  झोपडी, दरवाजे, टेबल – खुर्ची, टीपॉय बनविण्यासाठी सुद्धा वापर करतात.

बांबू लागवड महत्वाचे टप्पे :

1) बांबू लागवड करायच्या ठिकाणी उन्हाळ्यात 3 x 3 मीटर अंतरावर आखणी करून कंदापासून लागवड करण्यासाठी 60 x 60 x 60 सें. मी. आकाराचे खड्डे खोदून ठेवावेत. रोपापासून लागवड करावयाची असल्यास 30 x 30 x 30 सें. मी. आकाराचे खड्डे खोदावेत.

 

2) कंद लागवडीसाठी जर कंदाचा आकार मोठा असेल, तर त्यानुसार खड्ड्याचा आकार वाढवावा. पावसाळ्याच्या सुरवातीस खड्ड्यात चांगली माती, 250 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट मिसळावे.

 

3) अशा भरून घेतलेल्या खड्ड्यामध्ये कंद, पॉलिथिन पिशवीत वाढलेली रोपे किंवा गादी वाफ्यावर वाढविलेली रोपे रोपांच्या मुळांना इजा होणार नाही, अशा तऱ्हेने मातीसह काढून लावावीत.

 

4) बांबूस पाणथळ जमीन चालत नाही, त्यामुळे पावसाळ्यात खड्ड्यात पाणी साठणार नाही याची काळजी घ्यावी.

 

5) बांबू रोपांची पावसाळ्यात लागवड झाल्यानंतर पहिल्या वर्षी डिसेंबर ते मे महिन्यात लागवडीस पाणी द्यावे. निंदणी व भर देण्याचे काम लागवडीपासून तीन वर्षांपर्यंत करावे.

 

6) दर वर्षी पावसाळ्याच्या सुरवातीस प्रत्येक रोप/कंदाला 100 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट व 25 ग्रॅम युरिया याप्रमाणे खते द्यावीत. त्यानंतर दोन महिन्यांनी हीच मात्रा पुन्हा द्यावी.

 

7) कंदापासून लागवड केल्यास चार ते पाच वर्षांपासून उत्पादनास सुरवात होते. बांबूची लागवड जर रोपापासून केली, तर सहा ते आठ वर्षांनी उत्पादन मिळण्यास सुरवात होते.

 

8) कोंबातून बाहेर पडणारा बांबू पूर्णपणे वाढून बेटातील अगोदरच्या बांबूच्या आकाराएवढा झाला असेल, तर जुना बांबू जमिनीपासून 30 सें. मी. उंचीवर कापावा. पहिल्या कापणीपासून प्रत्येकी दोन वर्षांच्या कालावधीने पुढील बांबूच्या कापण्या कराव्यात. एक वर्षाचा कोवळा बांबू कापू नये. जितके नवीन कोंब आले असतील, तितकेच जुने बांबू तोडावेत. पक्व बांबू ठेवून नवीन बांबू तोडू नयेत.

” बांबू च्या लागवडी योग्य जातींची संक्षिप्त माहिती “

* शास्त्रीय नाव: Dendrocalamus strictus (डेन्ड्रोक्येल्यामस स्ट्रीकटस् )

फुलण्याचा कालावधी: ३०-३५ वर्षे

योग्य वातावरण आणि देखभाली खाली उंची: २५-५० फूट

योग्य वातावरण आणि देखभाली खाली जाडी: २-३.५ इंच

उपयोग: बांधकाम, विणकाम, हस्तकला,  फर्निचर,  BIO-CNG,  plyboard, खाण्यासाठी कोंब, चारा, शेतीसाठी काठ्या

विशेष सूचना: ह्या बांबू ची लागवड केल्यावर वेळोवेळी फांद्यांची तसे वेड्या वाकड्या काठ्यांची छाटणी करणे आवश्यक असते.

*  बांबू चे नाव: माणगा, मेस

शास्त्रीय नाव: Dendrocalamus stocksii (डेन्ड्रोक्येल्यामस स्टोक्सी )

फुलण्याचा कालावधी: ठराविक असा नाही.

योग्य वातावरण आणि देखभाली खाली उंची: २५-४० फूट

योग्य वातावरण आणि देखभाली खाली जाडी: २-३.५ इंच

उपयोग: बांधकाम, विणकाम, हस्तकला,  फर्निचर,  खाण्यासाठी कोंब, चारा, शेतीसाठी काठ्या

विशेष सूचना: हा बांबू सह्याद्री तसेच कोकणात लागवडी साठी योग्य आहे. इतर ठिकाणी याची उंची तसेच जाडी कमी राहू शकते.

*  बांबू चे नाव: एस्पर

शास्त्रीय नाव: Dendrocalamus asper (डेन्ड्रोक्येल्यामस एस्पर )

फुलण्याचा कालावधी: ६०-८० वर्षे

योग्य वातावरण आणि देखभाली खाली उंची: ६०-८० फूट

योग्य वातावरण आणि देखभाली खाली जाडी: ६-८ इंच

उपयोग: खाण्यासाठी कोंब, बांधकाम, हस्तकला,  फर्निचर,  BIO-CNG,  plyboard,

विशेष सूचना: हा बांबू अति पावसाच्या प्रदेशात लागवडीसाठी योग्य आहे. कमी पावसाच्या प्रदेशात प्रायोगिक तत्वावर लागवड होणे गरजेचे आहे. सह्याद्री तसेच कोकणात लागवडी साठी योग्य आहे. इतर ठिकाणी याची उंची तसेच जाडी कमी राहू शकते.

*  बांबू चे नाव: बुल्का, वनन, ब्रांडीसी

शास्त्रीय नाव: Dendrocalamus brandisii (डेन्ड्रोक्येल्यामस ब्रांडीसी )

फुलण्याचा कालावधी: ४५-६० वर्षे

योग्य वातावरण आणि देखभाली खाली उंची: ६०-८० फूट

योग्य वातावरण आणि देखभाली खाली जाडी: ६-८ इंच

उपयोग: बांधकाम, विणकाम, हस्तकला,  फर्निचर,  BIO-CNG,  plyboard, खाण्यासाठी कोंब,

विशेष सूचना: हा बांबू अति पावसाच्या प्रदेशात लागवडीसाठी योग्य आहे. कमी पावसाच्या प्रदेशात प्रायोगिक तत्वावर लागवड होणे गरजेचे आहे. सह्याद्री तसेच कोकणात लागवडी साठी योग्य आहे. इतर ठिकाणी याची उंची तसेच जाडी कमी राहू शकते.

*  बांबू चे नाव: कटांग, काष्टी, काटे कळक, काटोबां

शास्त्रीय नाव: Bambusa bambos (बांबूसा बांबोस)

फुलण्याचा कालावधी: ३५-५० वर्षे

योग्य वातावरण आणि देखभाली खाली उंची: ६०-८० फूट

योग्य वातावरण आणि देखभाली खाली जाडी: ५-६ इंच

उपयोग: बांधकाम, कागद लगदा, फर्निचर, इथेनॉल, BIO-CNG,  plyboard, खाण्यासाठी कोंब, औषधी पाने, चारा.

विशेष सूचना: हा बांबू काटेरी असल्याने याची लागवड आणि व्यवस्थापन अतिशय काटेकोरपणे करावे लागते, अन्यथा हा बांबू कापायला अतिशय त्रास होतो. जर काटेकोर पणे योग्य व्यवस्थापन होणार असेल तर लागवडीला हरकत नाही. नदी, नाले, ओढे यांच्या काठावर या बांबूची वाढ जास्त चांगली होते.

*  बांबू चे नाव: टूल्डा, जाती, मित्रींगा

शास्त्रीय नाव: Bambusa tulda (बांबूसा टूल्डा)

फुलण्याचा कालावधी: ३५-६० वर्षे

योग्य वातावरण आणि देखभाली खाली उंची: ३५-४५ फूट

योग्य वातावरण आणि देखभाली खाली जाडी: २-३.५ इंच

उपयोग: बांधकाम, विणकाम, हस्तकला,  फर्निचर,  BIO-CNG,  plyboard, खाण्यासाठी कोंब, चारा, शेतीसाठी काठ्या.

विशेष सूचना: कोरड्या वातावरणात या बांबू ला जास्त फांद्या येतात. त्या फांद्या छाटल्यास नवीन येणारे कोंब सरळ यायला मदत होते.

*  बांबू चे नाव: नुटन्स, मल्ल बांस

शास्त्रीय नाव: Bambusa nutans ( बांबूसा नुतन्स )

फुलण्याचा कालावधी: ३५-४० वर्षे

योग्य वातावरण आणि देखभाली खाली उंची: २५-४० फूट

योग्य वातावरण आणि देखभाली खाली जाडी: २-३.५ इंच

उपयोग:  बांधकाम, कागद लगदा, फर्निचर, इथेनॉल, BIO-CNG,  Plyboard

विशेष सूचना: कोरड्या वातावरणात या बांबू ला जास्त फांद्या येतात. त्या फांद्या छाटल्यास नवीन येणारे कोंब  सरळ यायला मदत होते. या बांबूची वेगवेगळया वातावरणात प्रायोगिक तत्वावर लागवड व्हायची गरज आहे.

*  बांबू चे नाव: भालुका, बराक, बाल्कू, भीमा

शास्त्रीय नाव: Bambusa balcooa ( बांबूसा बाल्कूवा )

फुलण्याचा कालावधी: ३५-४५ वर्षे

योग्य वातावरण आणि देखभाली खाली उंची: ३५-५० फूट

योग्य वातावरण आणि देखभाली खाली जाडी: ३-५ इंच

उपयोग:  बांधकाम, फर्निचर, इथेनॉल, BIO-CNG

विशेष सूचना: औद्योगिक दृष्ट्या अतिशय महत्वाचा असा हा बांबू आहे. याची फायदेशीर लागवड करायची असेल तर अनेक शेतकऱ्यांनी एकत्र येऊन करायला हवी. एकट्या दुकट्याने लागवड केली तर औद्योगिक दृष्ट्या  वापराला मर्यादा येतात. कोरड्या वातावरणात या बांबू ला जास्त फांद्या येतात. त्या फांद्या छाटल्यास नवीन येणारे कोंड सरळ यायला मदत होते.

Refrence and contact:

संपर्क – 02426-243252

अखिल भारतीय समन्वित वनशेती प्रकल्प,

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.