You are currently viewing कपाशीवरील बोंड सड: कारणे व उपाय योजना

कपाशीवरील बोंड सड: कारणे व उपाय योजना

  •  पात्या, फुले आणि बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत सततचे ढगाळ वातावरण, हवेतील अति आर्द्रता व रिमझिम पाऊस दीर्घ काळ राहिल्यास खबरदारीचा उपाय म्हणून आंतरिक बोंड सडण रोगाच्या व्यवस्थापनासाठी, कॉपर ऑक्सिक्लोराइड (५०% डब्लू.पी.) २५ ग्रॅम अधिक स्ट्रेप्टोमायसीन २ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे मिसळून फवारणी करावी. (अॅग्रेस्को शिफारस) 
  •  बोंडाच्या पृष्ठभागावर होणारा बुरशीचा संसर्ग रोखण्यासाठी, पायराक्लोस्त्रोबीन (२०% डब्ल्यू.जी.) १० ग्रॅम किंवा मेटीराम (५५%) अधिक पायराक्लोस्ट्रॉबीन (५% डब्लू.जी.) (संयुक्त बुरशीनाशक) २० ग्रॅम किंवा प्रोपीकोनॅझोल (२५% ई.सी.) १० मिली किंवा ॲझोक्सिस्ट्रॉबीन (१८.२% डब्लू डब्लू) अधिक डायफेनोकोनॅझोल (११.४% एस.सी.) (संयुक्त बुरशीनाशक) १० मिली किंवा प्रोपीनेब (७०% डब्लू.पी.) २५ ते ३० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी
कपाशीवरील बोंड सड: कारणे व उपाय योजना
कपाशीमध्ये मागील एक- दोन वर्षांपासून बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत हिरव्या बोंडातील आतील भाग सडण्याची समस्या दिसून येत आहे. त्याची कारणे व त्यावर करावयाच्या उपाययोजना खालीलप्रमाणे आहेत.
बोंड सडण्याचे प्रकार व कारणे:
बोंड सडण्याचे प्रामुख्याने दोन प्रकार आढळतात
१) बोंडाच्या पृष्ठभागावर होणारा संसर्ग:
या प्रकारात मुख्यतः काही रोगकारक बुरशी, कुजलेल्या अवशेषांवर जगणारे सूक्ष्मजीव तसेच काही प्रमाणात बोंडावरील जिवाणू करपा कारणीभूत असतो. साधारणतः बोंडे परिपक्व व उमलण्याच्या अवस्थेत असे प्रकार आढळून येतात. बहुतेक वेळा बोंडावर बुरशींची वाढ झाल्याचे दिसते.
पोषक घटक- सततचे ढगाळ वातावरण, रिमझिम पाऊस आणि हवामानातील अधिक आर्द्रता असे घटक ह्या प्रकारच्या बोंड सडण्याला पोषक असतात.
२) आंतरिक बोंड सडणे रोग:
ही समस्या प्रामुख्याने संधिसाधू व कमी प्राणवायू अवस्थेत तग धरणारे रोगकारक जिवाणू आणि काही प्रमाणात अंर्तवनस्पतीय रोगकारक बुरशी यांच्या संसर्गामुळे होतो. अशी बोंडे बाहेरून निरोगी दिसतात. मात्र, ती फोडली असता आतील रुई पिवळसर-गुलाबी ते लाल-तपकिरी रंगाची होऊन सडल्याचे दिसते. अगदी विकसित अवस्थेतील बियासुद्धा सडल्याचे आढळते.
बोंडावर पाकळ्या चिकटून राहिल्याने बोंडाच्या बाह्यभागावर ओलसरपणा राहतो. अशा ठिकाणी जीवाणूजन्य व बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढण्यास मदत होते.
पोषक घटक – पावसाळ्यात होणारा संततधार व रिमझिम पाऊस, सतत ढगाळ हवामान, हवेतील अधिक आर्द्रता, कळ्यांवर व विकसित होणाऱ्या बोंडावरील रस शोषणारे ढेकूण यांचा प्रादुर्भाव अशा घटकांमुळे आंतरिक बोंड सडण रोगाची समस्या आढळते.
उपाय योजना:
१. बोंडाना चिकटून राहिलेल्या सुकलेल्या पाकळ्या शक्यतो हाताने काढून टाकाव्यात. त्याठिकाणी ओलसरपणा राहून रोगकारक तसेच संधिसाधू जिवाणू व बुरशींची वाढ होणार नाही.
२. पात्या, फुले आणि बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत विशेषतः रस शोषक किडी व ढेकणांच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवून वेळीच उपाययोजना कराव्यात.
३. पात्या, फुले आणि बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत सततचे ढगाळ वातावरण, हवेतील अति आर्द्रता व रिमझिम पाऊस दीर्घ काळ राहिल्यास खबरदारीचा उपाय म्हणून आंतरिक बोंड सडण रोगाच्या व्यवस्थापनासाठी, कॉपर ऑक्सिक्लोराइड (५०% डब्लू.पी.) २५ ग्रॅम अधिक स्ट्रेप्टोमायसीन २ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे मिसळून फवारणी करावी. (अॅग्रेस्को शिफारस)
४. बोंडाच्या पृष्ठभागावर होणारा बुरशीचा संसर्ग रोखण्यासाठी, पायराक्लोस्त्रोबीन (२०% डब्ल्यू.जी.) १० ग्रॅम किंवा मेटीराम (५५%) अधिक पायराक्लोस्ट्रॉबीन (५% डब्लू.जी.) (संयुक्त बुरशीनाशक) २० ग्रॅम किंवा प्रोपीकोनॅझोल (२५% ई.सी.) १० मिली किंवा ॲझोक्सिस्ट्रॉबीन (१८.२% डब्लू डब्लू) अधिक डायफेनोकोनॅझोल (११.४% एस.सी.) (संयुक्त बुरशीनाशक) १० मिली किंवा प्रोपीनेब (७०% डब्लू.पी.) २५ ते ३० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी
५. आवश्यकतेनुसार १५ दिवसांच्या अंतराने दुसरी फवारणी करावी.
(संदर्भ: केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर)
वनामकृवि संदेश क्रमांक- १४/२०२० ( १३ सप्टेंबर २०२०)
अधिक माहितीसाठी संपर्क करा
कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ
परभणी
☎ ०२४५२-२२९०००